पाहा पाहा मंजुळा
|| पाहा पाहा मंजुळा ||
लयास गेली युगायुगाची हीन दीन अवकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा ||
रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला
शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला
बहरली कणसं इमानी माणसं नाचतो जोंधळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा ||
त्रिसरणाची झडप तयाला कुंपण पंचशीला
बुद्धं सरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला
फिटते भ्रांती मिळते शांती फुलते जीवनकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा ||
बोधिवृक्ष हे डुलती कैसे बांधाबांधावरी
गोड लागते साऊलीत या जीवनाची भाकरी
मळा हा राखू फळे हि चाखू झरा बाजूला निळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा ||
कोल्हेकुई हि कुपाकुपानं चाले बाहेरून
दुहीचा कुंदा वरती डोके काढितो आतून
हरेन्द्रासंग धरूया दोघं हाती एकीचा विळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा ||
कवी- हरेंद्र जाधव
गायक- विठ्ठल उमप
Comments
Post a Comment